
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एका नव्या वादळाची नांदी झाली आहे! भाजपला रामराम ठोकल्यानंतर के. अन्नामलाई यांनी थेट जनतेशी संवाद साधत राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळबळ उडवून दिली आहे.
त्यांच्या या धमाकेदार पत्रकार परिषदेतील आणि सोशल मीडिया संवादातील ‘टॉप ५’ मुद्दे, ज्यांनी सध्या देशाचं राजकारण तापवलं आहे:
१. भाजपशी ‘काडीमोड’ – राजीनामा मंजूर!
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. अन्नामलाई यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी तो तातडीने मंजूरही केला आहे. एका झटक्यात अन्नामलाई आता ‘मुक्त’ झाले आहेत.
२. बंडाची ठिणगी का पडली? (युतीचा ‘तो’ निर्णय)
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वाने अन्नामलाई यांच्या विरोधाला डावलून ‘AIADMK’ सोबत युती केली. पण निकालानंतर भाजपला केवळ १ जागा मिळाली! या पराभवानंतर दिल्लीच्या निर्णयावर अन्नामलाई प्रचंड नाराज होते. “राष्ट्रीय पक्षात राहून तामिळ अस्मितेसाठी लढण्यावर मर्यादा येतात,” असं म्हणत त्यांनी पक्षाला थेट सोडचिठ्ठी दिली.
३. मिशन ‘तामिळ-फर्स्ट’ – स्वतःचा नवा पक्ष!
अन्नामलाई आता कोणाच्याही हाताखाली काम करणार नाहीत! त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात स्वतःचा नवा प्रादेशिक पक्ष काढण्याची मोठी घोषणा केली आहे.
कसा असेल पक्ष? हा पक्ष पूर्णपणे ‘धर्मनिरपेक्ष’ (Secular) आणि ‘तामिळ-फर्स्ट’ (तामिळ अस्मितेला प्राधान्य देणारा) असेल.
कधी येणार? पुढील ६ ते ८ महिन्यांत या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा होईल.
४. द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजपला थेट आव्हान
आतापर्यंत तामिळनाडूत DMK विरुद्ध AIADMK असा सामना रंगायचा. त्यात भाजपने घुसण्याचा प्रयत्न केला. पण आता अन्नामलाई या तिन्ही पक्षांना बाजूला सारून जनतेसमोर एक ‘नवा, तरुण आणि स्वतंत्र पर्याय’ म्हणून उभे ठाकणार आहेत.
५. दिल्लीला पहिला झटका : भाषा धोरणावर बंड
काही दिवसांपूर्वीच सीबीएसई (CBSE) बोर्डाने ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘त्रिभाषा सूत्र’ आणलं होतं. अन्नामलाई यांनी थेट दिल्लीच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. तामिळ भाषेच्या रक्षणासाठी त्यांनी केंद्रावर घेतलेली ही जाहीर चिखलफेक, म्हणजेच त्यांच्या बंडाची पहिली ठिणगी होती!
थोडक्यात काय तर…
सिंगम स्टाईलचे माजी आयपीएस अधिकारी के. अन्नामलाई यांनी आता दिल्लीचं कमळ सोडून तामिळनाडूच्या मातीत स्वतःचा ‘नवा किल्ला’ लढवण्याची तयारी पूर्ण केली आहे. हा जुगार त्यांना तामिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री बनवणार की राजकारणातून बाजूला करणार? हे पाहणं रंजक ठरेल!